Goodbye 2020..


Goodbye 2020..




         गुडबाय २०२०.. कित्ती सोप्पं असतं ना, एखाद्या वर्षाला गुडबाय म्हणणं.. तसं म्हणावं तर लागणारंच. कारण, आपण सर्वजण पुढच्या नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत असतो. कदाचित, हे पुढचे नवीन वर्ष आपल्याला खूप काही देऊन जाईल आणि हे तरी वर्ष चांगलं असेल, या आशेने आपण पुढच्या वर्षात प्रवेश करतो खरं.. परंतु, तेही वर्ष आपल्या मनासारखं गेलं नाही की, पुन्हा त्या वर्षाला वाईट म्हणून बसतो. मग पुन्हा पुढच्या नवीन वर्षाचे वेध लागतात. असे चक्र दरवर्षी चालूच असते.

         या २०२० च्या सुरुवातीलाच सर्व काही सुरळीतपणे चालू होते. मग नंतर कोण जाणे? कुठला व्हायरस आला आणि सर्वच बिघडू लागले. लोकं आजारी पडली. याचा इलाज नसल्यामुळे कितीतरी नुकसान झाले. परिणामी, देशात लॉकडाऊन करावे लागले. याबद्दल, लोकांच्या मनात दहशती निर्माण झाल्या की, आता काय होणार? पूर्ण वर्ष बर्बाद होणार.. शाळा, कॉलेज, नोकऱ्या, कामधंदे यांना तात्पुरते बंद करण्यात आले. यातंच लोकं चिंतीत झाले. लोकांचे बाहेर पडणे, एकत्र येणे देखील बंद झाले. परंतु, त्यातही उगीच बाहेर फिरणाऱ्या लोकांपासून हा व्हायरस अधिकच पसरत गेला. फक्त सामान्य नागरिकांनाच नाही, तर पोलीस, डॉक्टर्स, मोठमोठे कलाकार तसेच, जवळपास सर्वांनाच तो स्पर्शून गेला. यात लोकं बरे झाले देखील, परंतु बऱ्याच लोकांना आपला प्राण ही गमवावा लागला. यातंच, हा आकडा पाहून लोकांच्या पायाखालची जमीन सरकली. इतक्यातंच, लोकं सगळी आशा हरवून बसले, निराशेत जाऊ लागले, सरकारला दोष देऊ लागले, जीवित व वित्तहानी झाल्यामुळे आत्महत्या वाढू लागल्या. अशाच अनेक वाईट गोष्टी घडत असल्यामुळे लोकं या वर्षालाच वाईट म्हणू लागले. हे वर्ष वाईट, हानिकारक, धोक्याचे अशा प्रकारचे शब्द कानावर येऊ लागले. मग त्यावर या वर्षाला सोशल मीडियावर देखील टोमणे मारत जोक्स, मिम्स, वाईट-साईट बोलणे सुरू झाले.

         हे वर्ष खूप वाईट, पुढचे वर्ष खूप चांगले..आणि पुढचे ही वर्ष मनासारखे नाही, तर तेही वर्ष वाईट.. असे का? ज्या वर्षात आपण जगत आहोत, तेच वर्ष आपल्यासाठी वाईट का असावे..? आपलेच नशीब चांगले आहे की, आपण या व्हायरसवर मात केली किंवा या व्हायरसपासून अलिप्त राहिलो आणि या वर्षाच्या अखेरीस येऊन पोहोचलो. मान्य आहे की, नुकसान हे सर्वांचेच झालेले आहे. परंतु, हा दोष या वर्षाचा नाही, तर या व्हायरसमुळे हे सर्व करण्यात आले आणि जे होते ते चांगल्यासाठीच होत असते. प्रत्येक वर्षात चांगलाच दिवस असतो. कोणताही दिवस हा वाईट कधीही नसतो. परंतु, जर आपण सत्य स्वीकारून पुढे गेलो नाही, तर कोणतीही गोष्ट आपल्याला कधीही लाभणार नाही. एखाद्या गोष्टीला वाईट म्हणण्याअगोदर हा विचार करा की, ते वाईट म्हटले गेले? काही तरी कारण असल्याशिवाय तर हे सर्व होणार नव्हते. जर हा व्हायरस या वर्षात नसता, तर तो कदाचित पुढच्या काही वर्षांत असता. मग त्या वर्षाला दोष देणार काय? या वर्षाने आपल्या सर्वांनाच खूप काही भरभरून दिले आहे. आपण आज वर्षाच्या शेवटापर्यंत येऊन पोहोचलो, हेच आपले भाग्य आहे. असेही आहे की, हे वर्ष खूपच लवकर गेले. परंतु, हे वर्ष उगीच वाया घालविणाऱ्यांना नक्कीच हे वर्ष खूप वाईट वाटेल. परंतु, ज्यांनी या वर्षातला प्रत्येक क्षण-क्षण जगला, त्यांना कधीही या वर्षात जगण्याचा कंटाळा आला नसेल. वाईट तर होणारंच होते आणि काळजी घेणे हे आपल्याच हातात होते. नियमांचे पालन करणे, निसर्गाच्या विरोधात न जाणे हे देखील आपल्याच हातात असते. परंतु, जर परिस्थिती हातानेच ओढावून घेतली, तर हे वर्ष वाईटच वाटणार..

         या वर्षात सर्वांनाच एक ब्रेक मिळाला आणि तो ब्रेकही अत्यावश्यक होता. कारण, वर्षानुवर्षे फक्त धावत असणारे, स्वतःकडे, घराकडे, परिवाराकडे, मुलांकडे फारसे लक्ष न देऊ शकणारे, स्वतःला ओळखू न शकणारे, काही क्षण या सर्वातून थांबू इच्छिणारे या सर्वांनाच एका ब्रेकची आवश्यकता होती. लॉकडाऊनमध्ये हे सर्वच शक्य झाले. घरबसल्याही लोकांनी बरीच कामे केली, स्वतःचे छंद जोपासले. 'वर्क फ्रॉम होम' ही प्रथा देखील सुरू झाली. याच निमित्ताने आपला देश हा डिजिटल झाला, असे म्हणावयास काही हरकत नाही. एखाद्या वेळेसाठी स्वतःचे काम कधीही थांबवू नका. ज्यांनी या वर्षातील खरे क्षण जगले त्यांना कळलेही नसेल की, वेळ हा कसा आणि कुठे गेला. अशा लोकांसाठी कोणताही दिवस वाईट नसतो. आनंदात जगलो, तर वेळेचेही भान राहत नाही. म्हणून, दिवस हा वाईट नसतो, परिस्थिती जशी असते तशीच वेळही असते. यामुळे, आपण सर्व काही हरवून बसत नाही. गेलेले वर्ष आपल्याला जीवनाचे अनुभव देते आणि येणारे वर्ष आपल्याला जगण्याची उमेद देते. स्वतःसाठी, स्वतःला ओळखण्यासाठी, स्वतःला वेळ देण्यासाठी आपल्या जीवनात ब्रेकही आवश्यक असतो. आता या वर्षाच्या अखेरचा दिवसही भरभरून जगून घेऊयात. या वर्षात काय गमावलं? हे सोडा.. आणि काय कमावलं? हे लक्षात ठेवा. या वर्षातील चांगल्या आठवणींनी व अनुभवाने या वर्षाला आनंदाने निरोप द्या. पुढचे नवीन वर्ष ही आनंदात जाईल.


✍️प्रणिता अशोक फडणीस.
©ALL RIGHTS RESERVED

Comments

Popular posts from this blog

जगातील सर्वांत श्रीमंत शहर: दुबई

जगातील सर्वात सुंदर देश : सिंगापूर

कमी वेळात अफाट प्रगती करणारा देश: मलेशिया