अस्सल नाशिकची मिसळ..
अस्सल नाशिकची मिसळ..
हिवाळा.. थंड वातावरण..आणि त्यात गरमागरम तर्रीदार मिसळ..आणि त्यात मिसळ जर नाशिकची असेल तर.. वाह! क्या बात है..
म्हणजे खरंतर मिसळ हे खाद्य नाशिकचंच आहे हे जगजाहिर जरी असले, तरी नाशिकच्या मिसळची चव ही नाशिक सोडून दुसरीकडे कुठेही नाही. नाशिक..आणि मिसळीचं नातं नाशिककरांच्या रक्तातंच आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच मिसळीचे सच्चे प्रेमी आहेत. जर नाशिकमध्ये राहूनही कोणाला मिसळ आवडत नसेल, तर ते मुळात नाशिककर नाहीतंच.. आणि नाशिकमध्ये येऊन कोणी मिसळ एकदा जरी खाऊन पाहिली, तर ते नाशिकचे सच्चे आशिक झालेच म्हणून समजा... नाशिकमध्ये कोणाला मिसळ आवडत नाही, असे कोणीही नाही. अस्सल मिसळीची मजा घ्यायची, तर ती नाशिकमध्येच..
मिसळीची सुरुवातंच मूळ नाशिकमध्ये झाली, असे म्हणावयांस काही हरकत नाही. मिसळ जेव्हा सुरू झाली, तेव्हा ती चुलीवर तयार केली जायची. त्यानंतरही, मिसळीत व मिसळीच्या चवीतही अनेक प्रकारचे बदल घडून आले.
मिसळीसोबत आजकाल अनेक प्रकार येतात. परंतु, अस्सल नाशिकची मिसळ म्हणजे गरमागरम वाफवलेली मऊ आणि मसालेदार उसळ, त्यावर वाफाळता रस्सा, त्यासोबत कांदा, लिंबू, दही.. त्याचसोबत पाव, पापड, जिलेबी, गुलाबजाम, ताक, लस्सी, रबडी इ. गोष्टींची नवलाई देखील वाढताना दिसते.. आणि इतकं सगळं असूनही मिसळ ही तर्रीशिवाय अपूर्ण ती अपूर्णच.. तर्रीमुळेच तर मिसळीला एकूण झणझणीतपणा आणि जिवंतपणा येतो. अर्थातंच, या सर्वांचे मिश्रण म्हणजे, अस्सल नाशिकची मिसळ...
जसे-जसे लोकांनी मिसळीची मागणी वाढवली तस-तसे नाशिकमध्ये अनेक प्रकारच्या मिसळीची दुकाने, रेस्तरां, हॉटेल्स, कॅफे, घरगुती मिसळ व्यवसाय, पार्सल पॉईंट्स आणि अगदी घरपोच सुविधाही झपाट्याने उपलब्ध झाल्या. यामुळे, लोकांचे व्यवसायही वाढले. तसेच, मागणी जास्त असल्यामुळे मिसळीची किंमतही वाजवी असते. इतर काही खाण्यापेक्षा लोकं सहसा मिसळीलाच प्राधान्य देतात. त्यात मिसळीची चवही सहभागी असते. जर मिसळीची चव जिभेवर कायमची बसली की मिसळीची किंमतही तिच्या चवीची बरोबरी करू शकत नाही. सुट्टीच्या दिवशी किंवा साधारणपणे दुपारच्या वेळी लोकं, ऑफिस कलिग्ज, मित्र-मैत्रिणी, कुटुंब, मित्रपरिवार असे खास मिसळ पार्टी करायला येतात. नाशिकमध्ये जागोजागी मिसळीचे अड्डेही झालेले पाहायला मिळतात. बरीच लोकं फक्त नाशिकची मिसळ खायला नाशिकला येतात.
या सगळ्यातंच नाशिक हे एक वैशिष्ट्यपूर्ण जरी असले, तरी नाशिकची मिसळ ही भल्याभल्यांच्या जीभेवरती कायमची तरळून जाते. नाशिकमधील नाशिककरांचे मिसळप्रेम हे जन्मोजन्मीचे आहे आणि यापुढेही कायम राहणार..
©ALL RIGHTS RESERVED


Nice
ReplyDelete