झोपल्यानंतर स्वप्ने का पडतात?
झोपल्यानंतर स्वप्ने का पडतात?
स्वप्नांची दुनिया ही एक वेगळी आणि विचित्र संकल्पना आहे. मानवाचा मेंदू हा त्याच्या इच्छापूर्तींसाठी नेहमीच सक्रिय असतो, परंतु ज्या इच्छा नेहमीच अपूर्ण राहिलेल्या असतात, त्या कुठेतरी पूर्ण व्हाव्यात म्हणून त्या इच्छा स्वप्नाचे रूप घेतात. असे म्हटले जाते की, स्वप्ने ही मानवाच्या अपूर्ण असलेल्या इच्छा पूर्ण करतात. सर्वच स्वप्न ही पूर्ण होऊ शकत नसतात, परंतु या इच्छा स्वप्नांचे रूप घेऊन आपल्याला मानसिक संतुष्टी आणि तृप्ती देतात.
स्वप्न म्हणजे काय..? याचे उत्तर असे देता येणार नाही. झोपलेल्या अवस्थेत आपल्या मेंदूतील न्यूरॉन्स (Neurons) सामान्यापेक्षा अधिक सक्रिय होतात. आपण झोपल्यानंतर बऱ्याचदा आपल्याला असे जाणवते की, आपल्या बाजूला कोणीतरी उभे आहे किंवा आपल्यासोबत काहीतरी भयानक होते आहे. काही जणांना झोपेत बोलायची किंवा चालायची सवय असते, काहींना एखादा आवडीचा पदार्थ स्वप्नात दिसतो व ते तो पदार्थ खाण्याचा प्रयत्न करतात, स्वप्नात दिसणाऱ्या एखाद्या गोष्टीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात, परंतु असे काहीही ते करू शकत नाही. काहीवेळा झोपेत बोलण्याचाही प्रयत्न करतात, परंतु त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नाहीत किंवा काहीजण झोपेत दचकतातही आणि तो देखील एक स्वप्नांचाच भाग असतो.
अशा प्रक्रियेत आपल्या मेंदूमध्ये एका प्रकारची रासायनिक प्रक्रिया घडत असते. ज्यामुळे आपले शरीर हे दुर्बल (Paralysed) होते आणि ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण असते. कारण, जर स्वप्नातील भीतीमुळे अचानक आपल्याला ओरडावेसे किंवा धावावेसे वाटले आणि आपले शरीर हे बधिर किंवा दुर्बल (Paralysed) नसेल, तर आपल्याकडून झोपलेल्या अवस्थेतंच त्या क्रिया घडू लागतील. परंतु आपल्या मेंदूला हे माहिती असते की, आपण स्वप्नात आहोत आणि म्हणूनच मेंदूतील घडणाऱ्या रासायनिक प्रक्रिया आपल्या शरीराला दुर्बल किंवा बधिर करतात, जेणेकरून आपल्याकडून अश्या क्रिया घडू नयेत आणि आपल्या शरीराला आराम मिळेल. अश्या अवस्थेत आपण अर्ध्या झोपलेल्या आणि अर्ध्या जागलेल्या अवस्थेत असतो. झोपलेल्या अवस्थेत असताना रासायनिक प्रक्रिया घडलेली असून देखील आपण काही वेळेपुरता हालचाल करण्यास असमर्थ असतो, त्यातही आपल्याला काही क्षणापुरता अचानक जाग जरी आली, तरी आपण आपल्या शरीराची हालचाल करू शकत नाही आणि आपण पुन्हा झोपी जातो.
आपला मेंदू दिवसभर कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा विचार करत असतो. झोपल्यानंतरही मेंदू हा सतत विचारांतच असतो. जेव्हा आपले डोळे घट्ट मिटलेले असतात आणि आतमध्ये डोळ्यांच्या हालचाली सुरू असतात, तेव्हा आपण गाढ झोपेतील स्वप्नांत असतो. स्वप्न हे आपल्या डोक्यातील विचार, आजूबाजूला घडून गेलेल्या, आपण नुकत्याच केलेल्या किंवा कधी न होणाऱ्या गोष्टी मेंदूत साठलेल्या असतात आणि झोपेतही विचार करताना आपल्या मेंदूत त्या गोष्टींची चित्रस्वरूपात झळकायला सुरुवात होते. त्यासोबत त्याची ध्वनिकल्पना करून त्याचा ध्वनी देखील ऐकावयास मिळतो. आपण याला झोपेत दिसणारे 'स्वप्न' म्हणत असतो, परंतु तो एक भ्रम असतो. काहीवेळा सकाळी आपल्याला आपण कोणते स्वप्न पाहिले हे आठवत नसते.
काहीवेळा आपल्याला चांगले, तर कधी काही वाईट स्वप्नेही पडतात. झोपण्यापूर्वी आपल्या स्वप्नात हेच दिसावे, असे आपण स्वतःच ठरवू शकत नाही. कारण, स्वप्न पडणे हे आपल्या हाती नसते. आपल्याला कधी, कसे, केव्हा आणि कोणते स्वप्न पडेल आणि स्वप्नात काय दिसेल? हे देखील सांगता येत नसते. काहीदा आधी पडून गेलेले स्वप्नही पुन्हा पडू शकते. काहीवेळा आपल्याला जे स्वप्न पडते, त्या स्वप्नाचा आपण दिवसभर विचार करत असतो किंवा काहीदा आपल्याला पडलेल्या स्वप्नाप्रमाणे आपला पुढचा दिवस जात असतो. समजा, आपण स्वप्नात काही विचित्र घडताना पाहिले, तर आपला पुढचा दिवस त्या स्वप्नाचा विचार करण्यात अथवा तर्क लावण्यात जातो, परंतु जर आपण स्वप्नात एखादी चांगली गोष्ट घडताना पाहिली, तर आपला पुढचा संपूर्ण दिवस अगदी सुंदर आणि आनंदात जातो. असे काहीवेळा आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांवरही अवलंबून असते. अगदी काही प्रमाणात काही स्वप्ने खरे ही होत असतील. पहाटे पडलेली स्वप्ने खरी ठरतात असे म्हणतातही, परंतु प्रत्येकदा ते खरे होतातंच असे नाही. अशी काही स्वप्ने जी जास्त करून आध्यात्मिक व्यक्तींना जास्त पडत असतात.
खरे सांगायचे झाले, तर आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांचा अतिविचार करणे म्हणजे घातकच. कारण, स्वप्ने ही आपल्या डोक्यात चालणाऱ्या विचारांमुळे पडत असतात, ज्यांचा आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्याशी काहीही संबंध नसतो. झोपेत पडणाऱ्या स्वप्नांना काहीही अर्थ नसतो, ते आपल्या विचारांचेच प्रतिबिंब असते. त्याकडे दुर्लक्षित करण्यातंच आपल्या सर्वांचे हित आहे. कारण, जर आपण आपल्याला पडणाऱ्या प्रत्येक स्वप्नाचा अर्थ काढून त्याचा तर्क लावून अतिविचार करत बसलो, तर आपण आपल्या खऱ्याखुऱ्या जीवनातील जगण्याचा अर्थच गमावून बसू आणि कायमचे स्वप्नातील भ्रमातंच जगत राहू.
✍️प्रणिता अशोक फडणीस
©ALL RIGHTS RESERVED



Comments
Post a Comment