आरोग्यदायी जीवनाचा मंत्र: (शांत झोप)


आरोग्यदायी जीवनाचा मंत्र: (शांत झोप)




आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी चांगली झोप असणे, हे देखील खूप महत्वाचे आहे. चांगल्या दर्जाची झोप तुमचे जीवन बदलून टाकते. आपल्या शरीराला चांगल्या दर्जाची झोप मिळाल्यामुळे आपल्या मेंदूची शक्ती ही वाढते आणि आपल्या शरीरातील मेद कमी होण्यास मदत होते.

आपल्या शरीराला किमान ७ ते ८ तासांची झोप पुरेशी असते. चांगली झोप असल्यामुळे आपल्या विचारांची प्रक्रिया जलद होते, आपण आपले काम ही अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो. रात्री व्यवस्थित झोप झाली नाही, तर त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशी उमटायला लागतात, परिणामी त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो, त्यामुळे आपली झोप अगदी कमी ही नसावी आणि जास्त ही नसावी. चांगल्या झोपेसाठी झोपेच्या वेळा देखील पाळल्या गेल्या पाहिजेत. आपण स्वतःच्या झोपेची एक जीवनशैली तयार केली पाहिजे.





• शांत झोपेसाठी एक चांगली जीवनशैली:-


• शांत झोप येण्यासाठी जेवण हे झोपेच्या किमान १ ते १.३० तास आधी असायला हवे. कारण, जेवल्यानंतर तुम्ही लगेच अर्ध्या तासात जर झोपलात, तर त्याचा तुमच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. जेवणानंतर काहीवेळातच आपली पचनक्रिया सुरू होते आणि जर रात्री तुम्ही काही जड आहार घेतलात, तर झोपलेल्या अवस्थेत ती पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. त्यामुळे, रात्रीचे जेवण थोडे हलके असावे. जेणेकरून, पचनक्रिया ही लवकर पूर्ण होते आणि झोप ही छान लागते.

• चांगली झोप हवी असेल, तर रात्री जेवणानंतर चुकूनही चहा, कॉफी, सिगारेट इ. गोष्टी घेऊ नका. त्याचा खूप जास्त वाईट परिणाम तुम्हाला जाणवत जरी नसला, तरी अप्रत्यक्षपणे तुमच्या आरोग्यावर होतो. कारण, चहा-कॉफी हे पदार्थ गरम असतात आणि झोपेसाठी तुम्हाला तुमचे शरीर आणि पोट थंड ठेवावे लागते. त्यामुळे, जेवणानंतर चहा, कॉफी, गरम दूध, सिगारेट इ. कधीही घेऊ नका. त्यामुळे, ऍसिडिटी देखील होऊ शकते. तसेच, रात्री जास्त तिखट व तेलकट पदार्थ ही खाऊ नका. रात्री जेवणानंतर दूध देखील शक्यतो थंड किंवा कोमट प्या. जेणेकरून, तुम्हाला रात्री भूक लागणार नाही आणि तुमचे पोट ही थंड राहील.

• शांत झोप लागण्यासाठी झोपण्यापूर्वी तुमचा फोन अजिबात वापरू नका. कारण, शांत आणि लवकर झोप लागण्यासाठी तुमचे डोळे आणि मन शांत असावे लागते आणि अंधारात फोनच्या वाईट किरणांमुळे तुमच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे, नजर ही अस्पष्ट होऊ लागते. यापेक्षा तुम्ही एखादे चांगले पुस्तक वाचू शकता किंवा वाचण्यास कंटाळा येत असल्यास ई-बुक च्या पॉडकास्ट्स ऐका. याखेरीज, शांत गाणे किंवा संगीत ऐकू शकता. ज्यामुळे, तुमच्या मनाला शांतता मिळून चांगली झोप लागेल.

• शांत झोप लागण्यासाठी तुमचे शरीर थंड असणे गरजेचे असते. जर तुम्ही रात्री व्यायाम किंवा कसरत करत असाल, तर ती रात्री न करता सकाळी करा. कारण, व्यायाम केल्यामुळे तुमचे शरीर गरम होते आणि शांत झोप लागण्यासाठी तुमचे शरीर थंड असणे महत्त्वाचे असते. जेवण झाल्यानंतर रात्री झोपताना सक्तीने ब्रश करा. कारण, रात्री जेवणानंतर झोपल्यास रात्रीच्या जेवणाची चव हळूहळू तुमच्या शरीरात पसरते. यामुळे, तुम्हाला पुन्हा भूक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे, रात्री झोपण्यापूर्वी ब्रश आणि माऊथवॉश करून झोपावे. ज्यामुळे, तुमचे तोंड ही थंड राहते व झोप ही छान लागते.

• रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या आजूबाजूला अजिबात प्रकाश नसावा. कारण, चांगली झोप लागण्यासाठी तुमचे डोळे पूर्ण काळोखात असायला हवेत. प्रकाशामुळे तुमची झोप खराब होऊ शकते. हवे असल्यास तुमच्या आजूबाजूला अत्यंत हलका प्रकाश असावा. परंतु, तो अगदी डोळ्यात जाणार नाही, याची काळजी घ्यावी. तुमचे व तुमच्या भोवतालचे तापमान अगदी सम असावे. ते जास्त थंड ही नको व जास्त गरम ही नको. जर तुम्ही पंखा लावून झोपत असाल, तर चांगली गोष्ट आहे. कारण, पंखा किंवा एसीमुळे तुमचे शरीर थंड राहून तुम्हाला शांत व लवकर झोप लागते.

• रात्री झोपताना असे काहीही करू नका, ज्याने तुमची आणि अजून बाकीच्यांची देखील झोप खराब होईल किंवा त्यांच्या झोपेवर परिणाम होईल. जर तुम्ही घोरत असाल, तर त्याचा त्रास तुमच्या बाजूच्या व्यक्तीला होत असतो. त्यासाठी, या गोष्टीवर त्वरित उपाय करा. झोपताना नेहमी तुमचे मन शांत ठेवा. झोपताना स्वतःचे, घरचे, ऑफिसचे, वैयक्तिक, व्यावसायिक, शारीरिक, मानसिक गोष्टींचा विचार करू नका. कुणाशी भांडण झाले असेल, तर त्याचा लगेच सोक्षमोक्ष लावा अथवा जर माफी मागून प्रश्न सुटत असतील, तर ते करा. कारण, तुमची आणि समोरच्याची झोप होणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण, जर तुम्ही फार विचार करत झोपण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला झोप लागणार नाही किंवा खूप उशीरा झोप लागेल आणि कदाचित स्वप्ने ही तशीच पडू शकतात. तुम्हाला उशीरा झोप लागल्यानंतर किंवा झोप झाली नाही, तर तुमचा पुढचा दिवस खूप परिणामकारक जाऊ शकतो, ज्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.




चांगले आरोग्य ठेवण्यासाठी आपण चांगल्या झोपेची जीवनशैली तर नक्कीच तयार करू शकतो. ज्यामुळे आपले आरोग्य व जीवन सफल होण्यास सुरुवात होईल.

✍️प्रणिता अशोक फडणीस
©ALL RIGHTS RESERVED

Comments

Popular posts from this blog

जगातील सर्वांत श्रीमंत शहर: दुबई

जगातील सर्वात सुंदर देश : सिंगापूर

कमी वेळात अफाट प्रगती करणारा देश: मलेशिया