झोपल्यानंतर घडत असणाऱ्या गोष्टी..


झोपल्यानंतर घडत असणाऱ्या गोष्टी..




         जेव्हा आपण झोपतो आणि पूर्ण झोप झाल्यानंतर सकाळी उठतो तेव्हा झोपेत आणि झोपल्यानंतर अश्या काही गोष्टी आपल्यासोबत घडत असतात, ज्या आपल्याला माहिती असायला हव्यात. कारण, या सर्वच गोष्टी आपल्या शरीराशी निगडित असतात.


• शरीर दुर्बल होणे (Sleep Paralysed)


काही दुर्बल (Paralysed) लोकं असतात, जे स्वतः एका जागेहून दुसऱ्या जागी हालचाल करू शकत नाहीत, परंतु आपण सामान्य असलो, तरी आपण जेव्हा झोपतो, तेव्हा आपण तेवढ्या वेळेपुरता दुर्बल (Paralysed) होतो. आपले शरीर बधिर झालेले असते आणि अश्या स्थितीत साधा स्पर्शही झालेला आपल्याला जाणवत नसतो. आपल्या शरीराचे तापमान ही किंचित वाढलेले असते. कारण, झोपेत आपली काहीही हालचाल नसते, त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह अगदी शिथिल झालेला असतो आणि शरीरातील उष्णता वाढते. आपल्याला ऐकू देखील येत नसते. ही काही घाबरण्यासारखी गोष्ट नाही, ही एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि ती सर्वांसोबत होत असते. झोपल्यानंतर आपल्याला या गोष्टीची जाणीव होत नसते. कारण, आपण पूर्ण गाढ झोपेत असतो.


• डोळ्यांची हालचाल-


आपल्याला असे वाटत असते की, आपण झोपल्यानंतर आपले डोळे हे एकाच जागेवर असतील, परंतु नाही.. जेव्हा आपण झोपतो, तेव्हा आपले डोळे हे खूप विचित्र प्रकारे व्यवहार करत असतात. गाढ झोपल्यानंतर आपले डोळे हे नेहमी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हालचाल करत असतात. हे नैसर्गिक असून सर्वांसोबतच होत असते आणि ही गोष्ट आपण गाढ झोपल्यानंतर आपल्याला कळत नाही.


• कमी श्वासोच्छ्वास-


जेव्हा आपण झोपतो, तेव्हा आपल्या शरीरात हवा जाण्याचा जो मार्ग असतो, तो देखील आराम करत असतो आणि त्यामुळे आपल्या घशाच्या भोवतालचा भाग (Throat Way) थोडा कमी आकाराचा होत जातो, यामुळे आपल्या शरीरात हवा ही कमी प्रमाणात जात असते. ही गोष्ट अजिबात धोकादायक नाही. ही गोष्ट नैसर्गिक आहे. कारण, आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपण कोणतेही काम करत नसतो आणि आपले शरीर आराम करत असते, त्यामुळे असे होते की, जो शरीरात हवा जाण्याचा मार्ग आहे, त्याचा आकार जेव्हा खूप जास्त प्रमाणात कमी होतो, तेव्हा ती गोष्ट सुरू होत असते, ज्याला साधारणपणे आपण 'घोरणे' असे म्हणतो. गाढ झोपेत असताना आपल्या घोरण्याचा आवाज आपल्याला येत नाही आणि आपण घोरत आहोत हे देखील आपल्याला कळत नाही.




• स्वप्न पडणे-


आपला मेंदू दिवसभर कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा विचार करत असतो. झोपल्यानंतरही मेंदू हा सतत विचारांतच असतो. जेव्हा आपले डोळे घट्ट मिटलेले असतात आणि आतमध्ये डोळ्यांच्या हालचाली सुरू असतात, तेव्हा आपण गाढ झोपेतील स्वप्नांत असतो. स्वप्न हे आपल्या डोक्यातील विचार, आजूबाजूला घडून गेलेल्या, आपण नुकत्याच केलेल्या किंवा कधी न होणाऱ्या गोष्टी मेंदूत साठलेल्या असतात आणि झोपेतही विचार करताना आपल्या मेंदूत त्या गोष्टींची चित्रस्वरूपात झळकायला सुरुवात होते. त्यासोबत त्याची ध्वनिकल्पना करून त्याचा ध्वनी देखील ऐकावयास मिळतो. आपण याला झोपेत दिसणारे 'स्वप्न' म्हणत असतो, परंतु तो एक भ्रम असतो. काहीवेळा सकाळी आपल्याला आपण कोणते स्वप्न पाहिले हे आठवत नसते.


• सर्वात शेवटी जागणारा अवयव: (नाक)-


आपण झोपल्यानंतर आपल्या शरीराचा प्रत्येक भाग हा झोपलेला असतो, तरी थोड्याशा आवाजाने ही आपली झोप तुटते, परंतु एक अवयव असा आहे की, ज्याला जागवणे खूप अवघड असते आणि जे सर्वात शेवटी जागते, ते म्हणजे 'नाक'. आपले शरीर आणि मेंदू जागल्यानंतर सर्वात शेवटी आपले नाक जागते. आपली झोप ही कोणत्याही आवाजाने मोडेल, परंतु जर कोणी आपल्या गाढ झोपेत आपल्या नाकाजवळ कोणते फूल किंवा कोणता पदार्थ आणून ठेवला, तरी आपल्याला जाग येणार नाही. कारण, कोणतीही व्यक्ती गाढ झोपेत किंचित असा वास ही घेऊ शकत नाही. ही देखील एक नैसर्गिक गोष्ट आहे.



• उंचीचा फरक जाणवणे-


झोपण्यापूर्वी आपण आपली उंची मोजून झोपलो, तर सकाळी उठल्यानंतर आपल्या उंचीत साधारण अर्ध्या इंचाचा फरक जाणवतो. सकाळी उठल्यानंतर आपली उंची ही अर्ध्या इंचाने वाढलेली दिसते. जेव्हा आपण झोपतो, तेव्हा आपल्या पाठीच्या कण्यावर गुरुत्वाकर्षणाचा थेट प्रभाव पडत नाही, त्यामुळे आपली पाठ टेकल्यानंतर आपल्या पाठीचा कणा पुन्हा सरळ रेषेत होतो आणि जेव्हा सकाळी उठल्यानंतर आपल्या पाठीच्या कण्यावर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पडून थोडा दाब पडतो, त्यामुळे सकाळी उठल्यानंतर ५-६ तासाच्या आत आपली उंची पुन्हा अर्ध्या इंचाने कमी होते. यात काही चिंतेची बाब नाही, ही एक साधारण गोष्ट आहे.




      अशा प्रकारे झोपल्यानंतर आपल्यासोबत अशा काही गोष्टी घडत असतात, ज्या खूप विचित्र अणि भयानक असतात. या गोष्टी आश्चर्यजनक आहेतंच, शिवाय या सर्व घडणाऱ्या गोष्टींमागे शास्त्र देखील आहे.


✍️ प्रणिता अशोक फडणीस
©ALL RIGHTS RESERVED

Comments

Popular posts from this blog

जगातील सर्वांत श्रीमंत शहर: दुबई

जगातील सर्वात सुंदर देश : सिंगापूर

कमी वेळात अफाट प्रगती करणारा देश: मलेशिया